अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १८ ऑगस्ट २०२३:-राज्याच्या काही भागांमध्ये आजपासून पावसाच्या सरी पडल्या. पण हवामान विभागाने अंदाज देऊनही काही ठिकाणी पावसाची उघडीप कायम आहे. हवामान विभागाने आज आणि उद्या दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टही दिला.
हवामान विभागाने आज पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज दिला. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अति जोरदार ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला. या पाच जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट दिला. तसेच विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमवरावती, वाशीम, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह जोर पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, जालना आणि खानदेशातील जळगाव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.
उद्याही राज्याच्या बहुतांशी ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. संपूर्ण विदर्भ, मराठवड्याला विजांसह काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर आणि सोलापूर तसेच खानदेशातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यातही काही ठिकणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. राज्याच्या इतर भागातही हलक्या ते मध्यम सरी होतील. तर काही ठिकाणी जोरदार पाऊसही पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.
आता माॅन्सूनची स्थिती काय आहे ते पाहू… माॅन्सूनचा आस असेलला कमी दब पट्ट्याचे पूर्वेकडील टोक हिमालयाच्या पायथ्याशीच आहे. हा पट्टा सध्या गोरखपूर, डेहरी, रांची, बालासोरपर्यंत विस्तारला आहे. बंगाल उपसागराच्या वायव्येला आणि शेजारच्या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. हे कमी दाब क्षेत्र पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारी भागापर्यंत विस्तारले आहे. समुद्रसपाटीपासून हे कमी दाब क्षेत्र ७.६ किलोमीटर उंचीवर असून दक्षिणेकडे झुकलेले आहे.