अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ० ४ऑगस्ट २०२३ :-समृद्धी महामार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत ट्रक जळून खाक झाला आहे. यामुळं समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
नाशिकहून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅकचा टायर फुटून भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झाला आहे. मेहकर जवळ ही घटना घडली. या ट्रकमध्ये केमिकल असल्यानं आगीनं लगेच रौद्र रुप धारण केलं होतं. ट्रकमधील संपूर्ण केमिकल जळून खाक झालं आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठं नुकसान झालं आहे. या घटनेमुळं समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरवरील वाहतूक काही काळ थांबवावी लागली. ही आग इतकी मोठी होती की जवळपासच्या गावातील नागरिक महामार्गावर धावत आले.
नेमकं काय घडलं?
समृद्धी महामार्गावर मेहकर नजीक धानोरा राजनी गावाजवळ मध्यरात्री एका बर्निंग ट्रकचा थरार बघायला मिळाला. नाशिकहून नागपूर येथे केमिकल घेऊन जाणाऱ्या एका ट्रकचा सुरुवातीला टायर फुटला आणि त्यानंतर हा ट्रक साईड बॅरियरला धडकला. त्यानंतर या ट्रकला आग लागली. ही आग एवढी भीषण होती की अग्निशमन दलाच्या चार बंबांना देखील ही आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास चार तास लागले. यामध्ये ट्रक पूर्णपणे जळून खाक झाली आहे. केमिकल असल्यामुळं कुठल्याही परिस्थितीत ही आग आटोक्यात येत नव्हती. नशीब बलवत्तर म्हणून यातून चालक आणि वाहक सुखरूप बचावले आहेत.