अकोला न्युज नेटवर्क ब्युरो दिनांक २३ जुलै :- Rain Update: राज्यात पुढील पाच दिवस पावसाच्या दृष्टीनं चिंतेचे असणार आहेत. कारण संपूर्ण राज्यभरात मुसळधार ते मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पुढील पाच दिवसांचा सविस्तर अंदाज जाहीर करण्यात आला आहे. (Rain Update Heavy rain to thundershowers are likely in Maharashtra next five days)
पुढील चार दिवस राज्यातील पावसाची स्थिती अशी असेल
दुसरा दिवस, रविवार, २३ जुलै २०२३
पश्चिम महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या राज्यांमध्ये तयारीत राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर, बीड, नगर, जालना, नगर, संभाजीनगर, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमध्ये कुठलाही इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळं इथं सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर बुलडाणा, परभणी, नांदेड हे जिल्हे वगळता संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तिसरा दिवस, सोमवार, २४ जुलै २०२३
रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशीव, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांना कुठलाही इशारा देण्यात आलेला नाही. तर उर्वरीत मुंबई, नाशिक, पुणे, बुलडाणा, परभणी, नांदेडसह उर्वरित संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
चौथा दिवस, मंगळवार, २५ जुलै २०२३
या दिवशी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे आणि पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, सोलापूर आणि धाराशीव या जिल्ह्यांना कुठलाही इशारा नाही पण पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसे उर्वित विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
पाचवा दिवस, बुधवार, २६ जुलै २०२३
कोकण किनारपट्टीवरील तीन जिल्हे तसेच सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना मिळून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, पुण्यासह संपूर्ण विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात सामान्य पाऊस राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.