Saturday, May 4, 2024
HomeदेशRepublic day : प्रजासत्ताक दिन दरवर्षी २६ जानेवारीला का साजरा केला जातो..?...

Republic day : प्रजासत्ताक दिन दरवर्षी २६ जानेवारीला का साजरा केला जातो..? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्त्व

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ जानेवारी २०२४:- यंदा भारत देश आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. २६ जानेवारी हा प्रत्येक भारतीयासाठी खूप खास आणि महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस लोकशाही पद्धतीने आपले सरकार निवडण्याची भारतीय नागरिकांची शक्ती प्रतिबिंबित करतो. भारताच्या इतिहासात हा दिवस अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. त्यामुळेच हा दिवस देशभरात आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. या राष्ट्रीय सणाचे वेगळे वैशिष्ट्य आहे, त्यामुळे लोक मोठ्या थाटामाटात हा सण साजरा करतात. पण, तुम्हाला माहित आहे का भारतात प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीलाच का साजरा केला जातो. हा प्रश्न तुमच्याही मनात निर्माण होत असेल, तर आज आम्ही तुम्हाला प्रजासत्ताक दिनाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व सांगणार आहोत.

खरे पाहता, प्रजासत्ताक दिन दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण देशात संविधान लागू करण्यात आले. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. त्यामुळेच या खास दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. सन १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची राज्यघटना लोकशाही बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्याचे काम सुरू झाले. २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांत तयार झालेले भारताचे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाच्या संविधान सभेने स्वीकारले. त्यानंतर पुढच्याच वर्षी २६ जानेवारी १९५० रोजी संपूर्ण देशात ही राज्यघटना लागू झाली.

२६ नोव्हेंबरला स्वीकारलेली भारतीय राज्यघटना लागू करण्यासाठी २६ जानेवारी हीच तारीख का निवडली गेली? हा प्रश्न जवळपास प्रत्येक भारतीयाच्या मनात येत असेल. संविधानाच्या अंमलबजावणीसाठी ही तारीख निवडण्यामागे एक विशेष हेतू होता. खरे तर, २६ जानेवारी १९३० रोजी काँग्रेसने इंग्रजांच्या गुलामगिरीविरुद्ध भारत पूर्णपणे स्वतंत्र घोषित केला होता. अशा स्थितीत संपूर्ण स्वराज प्रस्तावाच्या अंमलबजावणीच्या या तारखेचे महत्त्व लक्षात घेऊन राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी २६ जानेवारीची निवड करण्यात आली. १९५० मध्ये या दिवशी संविधान लागू झाल्यानंतर, देशाला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले आणि तेव्हापासून दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

जगातील सर्वात मोठे लिखित संविधान म्हणून भारताच्या संविधानाची ओळख :
स्वातंत्र्याबरोबरच देशासाठी राज्यघटनेची गरजही भासू लागली. अशा परिस्थितीत ती निर्माण करण्यासाठी संविधान सभा स्थापन करण्यात आली. या सभेने ९ डिसेंबर १९४६ पासून संविधान बनवण्याचे काम सुरू केले. भारताच्या या संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते. तर संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यात डॉ. आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्यामुळे त्यांना राज्यघटनेचे निर्मातेही म्हटले जाते. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे, ज्याला बनवण्यासाठी तब्बल २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांचा कालावधी लागला. यानंतर, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे देशाचे संविधान सुपूर्द केले. त्यामुळे दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.{Akola ANN NEWS NETWORK}

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!