अकोला न्यु नेटवर्क :- संत गाडगेबाबा म्हणजे विसाव्या शतकात महाराष्ट्राच्या भूमीने पाहिलेले व अनुभवलेले एक आश्चर्य आहे! वैराग्याचा मूर्तीमंत आविष्कार या संताच्या रूपाने उभ्या महाराष्ट्राला अनुभवयास मिळाला. ‘गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला’ असे भजन-कीर्तन करत अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन जनजागृतीचे विलक्षण कार्य करणारे गाडगेबाबा महाराष्ट्रातील लोकशिक्षणाचे चालते-बोलते विद्यापीठ होते. विज्ञानावर आधारित समाजप्रबोधन करणारे ते एक लोकोत्तर महापुरुष होते.
शेंदूर माखोनीया धोंडा, पाया पडते पोरे रांडा।
सोडोनिया ख-या देवा करती म्हसोबाची सेवा
अज्ञान, अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न गाडगेबाबा शिकलेले नव्हते तरी ते खूप बुद्धिमान होते. त्यांनी समाजाला शिक्षण, स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं. दिवसभर गाव स्वच्छ केल्यानंतर रात्री लोकांचं मन स्वच्छ करण्यासाठी गाडगेबाब कीर्तन करत. कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करत. अंधश्रद्धा दूर करत, परिश्रम, परोपकार याची शिकवण देत. ‘देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराण, तंत्र-मंत्र, चमत्कार यावर विश्वास ठेवू नका’, अशी त्यांची शिकवण होती. देव दगडात नसून तो माणसांत आहे, हे त्यांनी लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला. मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य म्हणायचं नाही, असे ते म्हणायचे.
जत्रामे फत्रा बिठाया तीर्थे बनाया पाणी
भई दुनिया बडी दिवानी ये तो पौसे की धुलधानी
माणसात देव शोधणार्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रुढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जीवापाड प्रयत्न केले. अशा या थोर समाजसुधारकाचे आज 23 फेब्रुवारी रोजी जयंती दिवस.
गाडगे महाराज यांची दशसुत्री
भुकेलेल्या अन्न द्या तहानलेल्या पाणी द्या वस्त्रहीन व्यक्तींना वस्त्र द्या गरीब मुलांना शिक्षणात मदत करा, प्रत्येक गरीबाला शिक्षण देण्यात योगदान द्या बेघर असलेल्यांना आसरा द्या अंध, विकलांग, आजारी व्यक्तींची मदत करा बेरोजगारांना रोजगार द्या पशू-पक्षी, मूक प्राण्यांना अभय द्या गरीब, कमजोर लोकांच्या मुलांच्या लग्नात मदत करा दुखी आणि निराश लोकांना हिमंत द्या हाच खरा धर्म आहे आणि हीच खरी ईश्वरभक्ती
परिचय :-
संत गाडगे बाबा हे कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगाव या ठिकाणी झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या आईचे नाव सखुबाई होते. गाडगे बाबा हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे गाडगे यांचे कीर्तन म्हणजे लोकप्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा,अंधश्रद्ध, रूढी,परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण ते देत. गाडगे बाबा म्हणजे एक चालती-बोलती पाठशाळा होती