Tuesday, May 21, 2024
Homeताज्या घडामोडीसावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर

सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-लोणार-शाळेपासून दूर असलेल्या मुलींना शाळेत येण्यासाठी सोईचे व्हावे, यासाठी मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप करण्यात येते. तालुक्यातील १ हजार २७० मुलींना ६३ लाख ५० हजार रुपयांच्या सायकली देण्यात आल्या आहेत. सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने सुकर झाल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे.

अतिमागास तालुका असलेल्या लोणार तालुक्यात ‘महाराष्ट्र राज्य मानव विकास मिशन’मार्फत ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलवाटप करण्याची योजना शिक्षण विभागाकडून राबविली जात आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत लोणार शहर आणि तालुक्यातील १३ जिल्हा परिषद आणि १८ खाजगी शाळा अशा एकूण ३९ शाळांमध्ये सायकलीवाटप करण्यात आल्या आहेत. इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या एक हजार २७० सावित्रीच्या लेकींना ६३ लक्ष ५० हजार रुपये किमतीच्या सायकलींचे मोफत वितरण करण्यात आले आहे. यायोजनेतून सायकल खरेदीसाठी प्रत्येक विद्यार्थिनींवर शासनाकडून ५ हजार रुपयांपर्यंतचा निधी खर्च करण्यात आला आहे. योजनेची अंमलबजावणी शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत करण्यात आली आहे. स्थानिक गटशिक्षण अधिकारी एस. आर. घुघे यांच्या मार्गदर्शनात गट संसाधन केंद्राचे केंद्र प्रमुख जंगलसिंग राठोड, मानव विकास मिशनचे तालुक्याचे समन्वयक भगवान कायंदे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली.

प्रत्येक विद्यार्थिनीला ५ हजार रुपये किमतीची सायकल
शाळेच्या मुख्याध्यापकाकडून इयत्ता ८ वी ते १० वीच्या मुली तसेच उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांकडून इयत्ता ११ वी ते १२ च्या लाभार्थी मुलीचे नाव निश्चित केले जाते. यात गाव व शाळेपासून असलेले गावाचे अंतर याची माहिती घेतली जाते. संबंधित शाळेच्या शालेय व्यवस्थापन व विकास समितीने विद्यार्थिनींची यादी अंतिम केल्यानंतर शिक्षण विभागाकडून या विद्यार्थिनींना ५ हजार रुपये किमतीच्या सायकलींचे वितरण करण्यात येते.

सायकल रॅलीतून दिला पर्यावरणाचा संदेश
लोणार तालुक्यातील एका हजारावर मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकली देण्यात आल्या आहेत. यामध्ये तालुक्यातून सर्वाधिक सायकलींचे वितरण लोणार येथील शिवाजी हायस्कूलमध्ये झाले. येथे २८८ विद्यार्थिनींनी सायकली दिल्यानंतर मुलींनी शहरातून सायकल रॅली काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. हिरडव चौक ते शिवाजी हायस्कूलपर्यंत सायकल चालवून मुलींनी पर्यावरणाबाबत जनजागृती केली.

एकाच शाळेत २८८ विद्यार्थिनींना सायकली
लोणार शहरातील श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता ८ वी ते १२ पर्यंतच्या आणि शाळेपासून ५ कि.मी. अंतरापर्यंत राहणाऱ्या २८८ विद्यार्थिनींना मानव विकास मिशन अंतर्गत १४ लक्ष ४० हजार रुपये किमतीच्या २८८ सायकल वाटप करण्यात आल्या. यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. खुशालराव मापारी, प्रकाशराव मापारी, विजय मापारी, केंद्रप्रमुख जंगल सिंग राठोड, शिवाजी हायस्कूलचे प्राचार्य म्हस्के व शिक्षक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!