Thursday, December 5, 2024
Homeब्रेकिंगविठ्ठलाचे झटपट दर्शन घ्यायचंय दोन हजार रूपये द्या पंढरपुरात दोन एजंट रंगेहाथ...

विठ्ठलाचे झटपट दर्शन घ्यायचंय दोन हजार रूपये द्या पंढरपुरात दोन एजंट रंगेहाथ पकडले

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑगस्ट २०२३ :-पंढरपूर सध्या अधिक महिना सुरु असल्याने रोज हजारोच्या संख्येने भाविक दर्शन रांगेत उभे राहून देवाचे दर्शन घेत असताना भाविकांकडून पैसे घेऊन देवाचे झटपट दर्शन घडविणारे दोन एजंट मंदिर व्यवस्थेत असणाऱ्या पोलिसांच्या हाती लागल्याने खळबळ उडाली आहे.हैदराबाद येथून आलेल्या विनोद उपुतल्ला आणि त्यांची पत्नी श्रीशा याना गडबड असल्याने झटपट दर्शन घेऊन परत जायचे होते. या भाविकांनी ज्या हॉटेलमध्ये उतरले होते त्या हॉटेल व्यवस्थापकाला झटपट दर्शनाबाबत विचारल्यावर त्यांनी शंतनू उत्पात याचा नंबर दिला होता. नंतर या उत्पात याने सागर बडवे यास जोडून दिल्यावर या दोन भाविकांना घेऊन सागर बडवे मंदिरात गेला आणि त्याने मंदिरातील संबंधिताला सांगून या दोघांना दर्शनाला पाठवले. याचा संशय मंदिर सुरक्षा व्यवस्थेवर असणाऱ्या वामन येलमार या पोलीस कर्मचाऱ्याला आल्यावर त्याने या दोन भाविकांना थांबवून त्यांचेकडून माहिती घेतली असता दोन हजार रुपये देण्याचे मान्य करून दर्शनाला आल्याचे या भाविकांनी सांगितले.

येलमार यांनी या भाविकांना व्यवस्थापकांकडे आणून त्यांच्यासमोर त्यांचे जबाब घेतले. हा अहवाल मंदिराकडे देण्यात आला असून आता या एजंटमध्ये मंदिर समिती आणि प्रशासन यातील कोणकोण सामील आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबाबत मात्र मंदिर व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. हा अहवाल आता वरिष्ठांच्या कानावर घालून त्यांनी आदेश दिल्यास या एजंटांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे पुदलवाड यांनी सांगितले. दरम्यान बडवे आणि उत्पात यांच्यासह अनेक एजंट विविध हॉटेलमधील भाविकांना अशा पद्धतीने पैसे घेऊन दर्शन घडवीत असल्याचे आरोप सातत्याने होत आले आहेत. या एजंटांचे मंदिर व्यवस्थापनाशी लागेबांधे असल्याने याचा तपास वरिष्ठ पातळीवरून करण्याची भाविकांची मागणी आहे .आज सापडलेल्या एजंटच्या माणसाला दर्शनासाठी मंदिर व्यवस्थापनातील कोणाच्या आदेशाने सोडले हा प्रश्न असून व्हीआयपीच्या नावाखाली असे रोज कित्येक भाविकांना सोडण्यात येते. मंदिराचे सीसीटीव्ही, कर्मचारी आणि एजंटांचे मोबाईल याची तपासणी केली तर विठ्ठल मंदिरातील दर्शनाचा काळाबाजार समोर येऊ शकणार आहे. मात्र प्रत्येक वेळी मंदिराच्या बाबतीत असे प्रकार घडले की ते लगेच मिटवून टाकण्यावर प्रशासनाचा भर असल्याने मंदिरातील हा दर्शनाचा बाजार बाहेर येत नाही.

मंदिर समितीची मुदत संपून दोन वर्षे झाली असून व्यवस्थापक गेल्या सहा वर्षांपासून एकाच जागेवर असल्याने सध्या मंदिरात असले प्रकार राजरोसपणे सुरु आहेत . शासनाने मंदिराच्या चौकशीसाठी एखाद्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याला तातडीने प्रशासक म्हणून नेमून मंदिराची चौकशी केली तर दर्शनाच्या काळाबाजारासोबत मंदिराच्या टेंडरचे घोटाळे आणि बरेच काही उघड होणार आहे. आज सापडलेले शंतनू उत्पात , सागर बडवे यांच्या चौकशीला सुरुवात करताना , मंदिराचे पूर्वीचे सीसीटीव्ही रेकॉर्ड , कर्मचारी आणि एजंटांचे मोबाईल , त्यावर झालेले व्यवहार याबाबी देखील तपासल्यास विठ्ठल मंदिरातील दर्शनाच्या काळाबाजाराचे मोठे रॅकेट उघडे होणार आहे . यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुदत संपलेली मंदिर समिती बरखास्त करून तातडीने एक IAS अधिकाऱ्याकडे या सर्व प्रकरणाची तपासणी दिल्यास तासंतास दर्शन रांगेत उभारणाऱ्या भाविकांना किमान दोन तास तरी आधी सुलभ दर्शन मिळू शकेल .

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp