अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २९ जुलै २०२३:-ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला आहे. शुक्रवारी सायन कोळिवाड्याचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. यावरून उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. एकएकाला काय फोडता. हिंमत असेल तर निवडणुका घ्याच, असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. जे लोक आपला पक्ष सोडून गेले आहेत, त्यांना आता ‘जय महाराष्ट्र’. आता त्यांचे आणि आपले संबंध तुटले आहेत. आता एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी आता पक्षाशी गद्दारी करू नये. पक्षाविरोधी काम करू नये. अन्यथा आपल्याला शिवसैनिक म्हणून याकडे बघावं लागेल, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला आहे.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, मी तुम्हाला मागेच सांगितलं आहे की, ज्यांना जायचं आहे, त्यांना जाऊ द्या. माझ्या एक गोष्ट लक्षात येतेय की, कुणीतरी पक्षाला सोडून गेल्यानंतर आपल्या सागराला जास्त उधाण येतंय, मग ते उधाण रागाचं आहे… त्वेषाचं आहेय… जिद्दीचं आहे… आपली जिंकण्याची ईर्ष्याही आणखी वाढत आहे. पक्षातून जे गेलेत त्यांना आता ‘जय महाराष्ट्र’ आहे. आता त्यांचे आणि आपले संबंध तुटले आहेत. मला आता एवढीच अपेक्षा आहे, त्यांनी (शिंदे गट) तिकडे गेल्यानंतर पक्षाशी गद्दारी करू नये. पक्षाविरोधी कामं करू नयेत. नाहीतर आपल्याला शिवसैनिक म्हणून याकडे बघावं लागेल. कोणत्याही परिस्थितीत आपले बालेकिल्ले राखायला तुम्ही सगळे समर्थ आहात. आता आपल्यात जे भक्तीचं उधाण येतंय, ते पाहून आता त्यांनाच धक्के बसतील. एवढं होऊनही शिवसेना का संपत नाहीये? उद्धव ठाकरे का संपत नाही? असा त्यांना प्रश्न पडेल. प्रत्येक वेळी टीका करताना त्यांना उद्धव ठाकरेंवरच बोलावं लागतं. कारण त्यांना तुमची धास्ती आहे. त्यामुळे एक-एक सहकारी फोडण्यापेक्षा एकदाच निवडणुका घेऊन दाखवा. असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं आहे