अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०४ ऑगस्ट २०२३ :-देवदर्शनासाठी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील 50 हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी ओरबडून नेले. सावेडी उपनगरात गुलमोहर रस्त्यावरील समतानगर कॉलनीत बुधवारी (दि.2) सायंकाळी ही घटना घडली.
याप्रकरणी कविता आकाश वराडे (वय 48 रा. हाडको कॉलनी, एकविरा चौक, सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कविता वराडे व त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या रेखा रमेश भंडारी या दोघी बुधवारी सायंकाळी गुलमोहर रस्त्यावरील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. तेथून त्या गजानन महाराज मंदिर, नवलेनगर, गुलमोहर रस्ता येथे दर्शनासाठी निघाल्या असता समतानगर कॉलनी येथे दुचाकीवर समोरून आलेल्या एकाने कविता यांच्या गळ्यातील 50 हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून धूम ठोकली. कविता यांनी आरडाओरडा केला असता घटनास्थळी लोक जमा झाले. त्यांनी तोफखाना पोलिसांना फोन केल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. कविता यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.