राज्यात अजूनही हवा तसा पाऊस झालेला नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. परंतु आता राज्यात पाऊस सक्रीय होणार आहे. हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अर्धा जुलै महिना झाला आहे तरी राज्यांत अजूनही पुरेसा पाऊस नाही. राज्यातील अनेक धरणांमध्ये पाण्याची पातळी खालवली आहे. उशिरा आलेला मान्सून त्यानंतर पावसाने घेतलेली विश्रांती यामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. आता गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत पाऊस सुरु झालाय. मुंबई शहरासह उपनगरांमध्ये सोमवारी पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु आहे. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यातील काही भागांत मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
काय आहे हवामान विभागाचा अंदाज राज्यात पुढील 4-5 दिवस मान्सून सक्रिय राहणार आहे. तसेच कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी व्यक्त केला आहे. यंदा प्रथमच मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. चंद्रपूरमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुंबई शहराला 3 दिवसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुणे जिल्ह्यास सोमवारी ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.