अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ० ४ऑगस्ट २०२३ :-राज्याचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर भाजपमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने झाडाझडती सुरू केली आहे. त्याचा एक भाग म्हणून भाजप सर्व आमदारांना थेट त्यांचं रिपोर्ट कार्डच देणार आहे. जे आमदार कच्चे आहेत, त्यांची कान उघाडणी केली जाणार आहे. तसेच जे आमदार कच्चे आहेत, त्यांच्या मतदारसंघात पर्याय देण्यावरही भाजपकडून विचार केला जात आहे. त्यामुळे ‘ढ’ आमदारांना भाजपकडून नारळ दिला जाणार असल्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे.आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी पाऊसच पडलेला नाही. त्यामुळे आमदार मतदारसंघात जाऊन तेथील नागरिकांची विचारपूस करणार आहेत. मतदारसंघात जाऊन पाहणी करणार आहेत. मात्र, असं असतानाच भाजपने सर्व आमदारांना येत्या 18 ऑगस्ट रोजी मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात ही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
चार वर्षाच्या कामगिरींची मार्कशीट
प्रदेश कार्यालयात होणाऱ्या या बैठकीत भाजप 106 आमदारांच्या हाती त्यांची ‘मार्कशीट’ ठेवणार आहे. कोणत्या आमदाराची कशी कामगिरी कशी आहे? प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघातील सर्वे काय म्हणतो यावरही चर्चा होणार आहे. कोण कुठे कमी तर कोण कुठे मागे? हे यातून दिसणार आहे. आमदारांच्या 4 वर्षातील कारकिर्दीची ही मार्कलिस्ट तयार करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पर्यायी उमेदवारांना सूचना देणार
या बैठकीत अनेक भाजप आमदारांची कानउघाडणी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मार्कशीट हाती दिल्यानंतर नापास होणाऱ्या किंवा काठावर पास होणाऱ्या आमदारांसाठी भाजपचा रेड ॲलर्ट जारी केला जाणार आहे.परिस्थिती न सुधारल्यास पर्यायी उमेदवारांनाही कामाला लागण्याच्या सूचना दिल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मिशन विधानसभा
मिशन लोकसभा आणि विधानसभेसाठी भाजप कामाला लागली आहे. भाजप जोरदार मोर्चेबांधणी करत आहे. प्रत्येक मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रीत केलं आहे. आमदारांना मतदारसंघात कामे करण्यास सांगितलं आहे. नागरिकांच्या समस्या सोडवतानाच मतदारसंघ बांधणीवरही लक्ष देण्यास सांगितलं आहे. कोणत्याही परिस्थिती राज्यात पुन्हा सत्ता आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. राज्यातील 145 जागांवर भाजपने लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप कामाला लागली आहे.