अकोला न्यूज नेटवर्क दिनांक०८ ऑगस्ट २०२३ :-महाराष्ट्रातील सर्वात जास्त चर्चेत येणारा विषय आता पुन्हा चर्चेत आला आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार का? या प्रश्नावरुन पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी दोन्ही पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. याशिवाय सर्वसामान्य जनतेमधील अनेकांची तशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्याकडून त्यासाठी प्रयत्न देखील करण्यात आले. पण उद्धव ठाकरे यांच्याकडून हवा तसा सकारात्मक प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या फक्त चर्चाच सुरु असतात. पण या चर्चां सकारात्मक होवू शकतात.
उद्धव ठाकरे यांनी सोमवारी खासगीत मोठे वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन करण्यास तयार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी खासगीत याबाबतचे वक्तव्य केले आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना फोन करण्यासाठी तयार असल्याची माहिती मिळत आहे. वेळ आल्यास राज ठाकरे यांच्याशी बोलणार, असे उद्धव ठाकरे खासगीत म्हणाले आहेत. राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे संग्रहित केली होती. 1966 ते 1990 या काळातील बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे श्रीकांत ठाकरे यांनी ग्रामोफोनमध्ये रेकॉर्ड केली होती. त्यावेळी टीव्ही नव्हता. त्यामुळे ग्रामोफोनमध्ये ती भाषणे रेकॉर्ड करण्यात आली होती. ती भाषणे राज ठाकरे यांच्याकडे आहेत. याच भाषणांसाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना फोन करण्याची शक्यता आहे.(AKOLA NEWS NETWORK )