अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २७ जुलै २०२३ :- नाशकात गेल्या दोन दिवसांपासून अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी काही गुडांनी नागरिकांच्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या घटनेतील गुन्हेगारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. एवढेच नव्हेतर, त्यांना अद्दल घडवण्यासाठी पोलिसांनी भर पावसात त्यांची नाशिकरोड परिसरातून धिंड काढली. या गुन्हेगारांच्या त्रासाला वैतागलेल्या नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, या गुन्हेगारांनी सोमवारी आणि मंगळवारी विहितगाव आणि धोंगडेमळा येथील वाहनांचे मोठे नुकसान केले. ज्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी गुन्हेगारांनी वाहनांची जाळपोळ आणि तोडफोड केली. गेल्या दोन दिवसांपासून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने नागरिकांनी पोलिसांत तक्रार दिली. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपींच्या वेळीच मुसक्या आवळल्या.
यानंतर पोलिसांनी नागरिकांच्या मनातील भिती दूर करण्यासाठी या घटनेतील गुन्हेगारांची भर पावसात धिंड काढली. पोलिसांनी त्यांची नाशिकरोड परिसरातील धोंगडे नगर, राजलक्ष्मी मंगल कार्यालय, विहितगाव, देवळाली गाव भागात धिंड काढली. यापुढे कोणताही व्यक्ती अशाप्रकारचे गुन्हे करू नये, या उद्देशाने पोलिसांनी गुन्हेगारांची धिंड काढली.
नाशिक शहरातील अनेक भागांमध्ये सातत्याने वाहनांची तोडफोड होत असल्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. पोलिसांनी याप्रकरणातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळ्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.