Thursday, June 13, 2024
Homeअध्यात्मVIDEO: माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यादरम्यान आळंदीत पोलिसांकडून वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार

VIDEO: माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यादरम्यान आळंदीत पोलिसांकडून वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार

ANN अकोला नेटवर्क ब्युरो दि. 11 जुन :- दरवर्षी आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी आळंदीत दाखल होत असतात. याच पार्श्वभूमीवर आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा उत्साहात पार पडत आहे. दरम्यान, पालखी सोहळ्याला गालबोट लावणारी घटना घडली आहे.

आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींचा प्रस्थान सोहळा सुरू असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

खरं तर, पालखी प्रस्थानावेळी मुख्य मंदिरात गर्दी आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी प्रत्येक दिंडीतील ७५ वारकऱ्यांनाच आत घेण्याचं देवस्थाने ठरवलं आहे. तशी विनंती दिंडी मालकांना, फडकऱ्यांना आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगेश देसाई यांनी केली आहे. असं असताना काही वारकरी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी मंदिर परिसरात उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे.

येथे क्लिक करून पाहा पूर्ण व्हिडिओ

गेल्यावर्षी प्रस्थानावेळी मंदिरात १७ हजार वारकरी दाखल झाले होते. त्यामुळे यावर्षी दिंडीतील वारकऱ्यांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली. पालखी सोहळ्याच्या प्रस्थान सोहळ्याच्या वेळी दिंडीतील प्रत्येक दिंडीतील केवळ ७५ वारकऱ्यांनाच आतमध्ये घेऊन जाण्याचं आवाहन आळंदी देवस्थानाकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे मुख्य मंदिराबाहेर शेकडो वारकरी जमले आहेत. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात केला आहे. यावेळी काही वारकऱ्यांनी मुख्य मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

यावर पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, ‘पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या 56 पालख्या आल्या होत्या. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत 3 वेळा बैठका घेऊन गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी 75 जणांना प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला आणि तसे नियोजन सुद्धा करण्यात आले.

मानाच्या दिंडीप्रमुखांनी सुद्धा तो मान्य केला. त्यानुसार पासेस वितरित करण्यात आल्या. मुख्य म्हणजे सर्व मानाच्या दिंडी प्रत्येकी 75 जणांनाच पाठवित होते. मात्र आज अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मंदिर विश्वस्त आणि चोपदार सुद्धा त्यांना समजावण्यासाठी आले. पण ते युवक ऐकत नव्हते.

बॅरिकेड तोडून त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली, पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केलेला नाही. त्यामुळे लाठीचार्ज केला, हे म्हणणे खोटे आहे. सर्व वारकरी, प्रशासनाला उत्तम सहकार्य करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची उच्च परंपरा असलेल्या वारीला उगाच गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये, अशी विनंती देखील पोलीस आयुक्तांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!