अकोला न्यूज नेटवर्क दिनांक १४ सप्टेंबर २०२३ :- देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले क्षेत्र म्हणजे कृषीक्षेत्र होय. या क्षेत्राचा प्रमुख भारवाहक आहे तो सर्जा-राजा शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावत बाराही महिने शेतात राबणारा बळीराजाचा सखासोबती म्हणजे बैल. याच बैलाच्या बळावर शेतकरी घरी, अंगणी धान्याच्या राशी लावतो. त्याच्याप्रती आभार, ऋण आणि कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा होय.गुरूवारी(ता. १४) शहरासह ग्रामीण भागात पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रात दरवर्षी पिठोरी अमावस्येला पोळा सण येतो. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पोळा हा सण अविभाज्य अंग आहे. आठवड्याभरापासूनच शेतकऱ्यांना पोळ्याचे वेध लागतात. त्याच्या शृंगारासाठी साहित्य खरेदीसाठी बाजार सजलेले असतात. साजशृंगार खरेदीची लगबग सुरू असते. लहान, थोरांपासून घरातील सर्वच सदस्य उत्साही असतात. पोळ्याच्या दिवशी तोरणाखाली उभा असतानाच आपला सर्जाराजा उठून दिसावा यासाठी शेतकरी त्याला सजवत असतो.

बैलाची अंघोळ आणि खांदामळणी
बाराही महिने शेतीची अवजारे आणि बैलगाडी वाहून नेल्याने बैलाचे खांदे कडक होतात. काही बैलांच्या खांद्यांना चिरेही पडतात. त्यांना कदाचित वेदना होत असतील तर पण सांगू शकत नाहीत. शेतकरी बैलाच्या वेदना जाणतो.

पोळा सणाच्या काळात बैलाला आराम दिल्या जातो. सकाळी त्याला गावातील नदी, विहिरी अथवा तलावावर नेऊन साबण, उटणे लावत आंघोळ घालतात. दुपारी त्याला चारा दिल्यानंतर आराम देतात.

सायंकाळच्या सुमारास खांदा मळणीची तयारी सुरू होते. बैलाच्या खांद्यावर तूप, हळद चोळून त्याला मुलायम केल्या जाते. तत्पूर्वी गरम पाण्याने खांदा शेकल्या जाते. आपआपल्या भागातील प्रथेप्रमाणे कुठे दही, भात व मोळ चोळतात. बैलाच्या अंगावर गेरूचे ठिपके लावतात.

शिंगाना बेगड बांधतात. त्यानंतर गोठ्यात बैलाची पूजा करून औक्षण केल्या जाते अर्थात त्याची सेवा केली जाते.आजपर्यंत जशी साथ दिली तशीच साथ पुढेही देत राहशील अशी साद घातली जाते.

यांत्रिक युगातही महत्व कायम
आजचे युग यात्रिकीकरणाचे आहे. बहुतांश शेतीकामे अत्याधुनिक यंत्राच्या माध्यमातून केली जातात. पण,शेती-शेतकरी-बैल हे समीकरण मात्र कायम आहे. गोठ्यात बैल नसले तर शेतकऱ्याला करमत नाही. जी मजा बैलाच्या खांद्यावरील बैलगाडीत बसून शेतात जाण्याने येते ती ट्रॅक्टरने येत नाही. बैलाशी शेतकऱ्याच्या भावना जुळलेल्या आहेत.


Share post:

Popular

More like this
Related

सावित्रीच्या लेकींच्या शिक्षणाची वाट सायकलने केली सुकर

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-लोणार-शाळेपासून दूर...

जागतिक पर्यटन दिन

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ सप्टेंबर २०२३ :-कधी झाली...

विहीरीत उडी घेऊन इसमाची आत्महत्या

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक २५ सप्टेंबर २०२३ स्वप्नील...
error: Content is protected !!