अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ३१ जुलै२०२३ :-शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्यावर राज्यभरातून टीका केली जात आहे. “महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं. पण, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत”, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. याप्रकरणी त्यांच्या विरोधात अनेक ठिकाणी तक्रार देखील दाखल करण्यात येत आहेत. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीट करत आपला
संताप व्यक्त केला आहे. प्रकाश आंबेडकर ट्वीटमध्ये म्हणाले की, “भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेने महात्मा गांधी यांच्याविषयी केलेलं वक्तव्य अत्यंत निषेधार्थ आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने मनोहर कुलकर्णीचा त्याचवेळी बंदोबस्त केला असता, तर ही वेळ आली नसती.” तर दुसरीकडे संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे.या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे महानायक आहेत, त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. भिडे गुरुजी आणि इतर कोणीही अशाप्रकारचे वक्तव्य करु नये. महात्मा गांधी असोत की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य सहन होणार नाहीत. या संदर्भात उचित कारवाई करण्यात येईल.”
नेमकं काय म्हणाले होते भिडे ?
संभाजी भिडे म्हणाले, मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही संभाजी भिडे यांनी केला आहे.