अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑगस्ट २०२३ :-राज्यात एकाच वेळी दोन दोन उपमुख्यमंत्री आणि तेही प्रभावी असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कामगिरी काहीशी झाकोळली जात असल्याचे चित्र आहे.अशातच न्यायालयीन आदेशामुळे विधानसभा अध्यक्षांकडून कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आणि अजित पवार गटाच्या समावेशामुळे घसरलेली बार्गेनींग पॉवर अशा विविध मुद्द्यांवरुन शिंदे गटाची जोरदार कोंडी सुरु आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी दस्तुरखुद्द विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीच मुख्यमंत्र्यांसाठी आरक्षीत ठेवलेली खुर्ची उपलब्ध करुन दिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.
निमित्त ठरले मनोरा आमदार निवास्थान इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचे. या कार्यक्रमास दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार होते. मात्र, काही कारणांमुळे त्यांना उपस्थित राहता आले नाही. दरम्यान, कार्यक्रम सुरु झाला. या वेळी कार्यक्रम नियम आणि संकेतांनुसार मान्यवरांची आसनव्यवस्था केली होती. त्यातच आसनावरुन गोंधळ होऊ नये यासाठी प्रत्येक मान्यवरांच्या नावाच्या पाट्याही खुर्च्यांवर लावल्या होत्या. मात्र, मुख्यमंत्री कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. या वेळी नार्वेकरांनी अजित पवार यांना खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला. त्यावर ती खुर्ची मुख्यमंत्र्याची असल्याचे सांगत अजित पवार यांनी विनम्रपणे त्यास नकार दिला. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी स्वत:च त्या खुर्चीवरील मुख्यमंत्री असे लिहीलेले स्टीकर काढून टाकले. त्यानंतर अजित पवार त्या खुर्चीवर बसले. प्रसारमाध्यमांनी या प्रसंकाचे वार्तांकन केले. (हेही वाचा, Maharashtra Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे वृत्त, इच्छुकांच्या आकांक्षांना नवे धुमारे )
दरम्यान, इतका सुंदर सोहळा पार पडल्यावर त्यात उगाचच काहीतरी निरर्थक मुद्दे काढून प्रसारमाध्यमांनी वार्तांकन करु नये. काही व्यक्तीगत कारणांमुळे मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी पोहोचायला उशीर झाला. त्यामुळे ते या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत, असे सांगत विधानसभा अध्यक्षांनी वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजित पवार यांना खुर्ची दिल्यावर ते विशेष काहीच बोलले नाहीत.दुसऱ्या बाजूला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मात्र विधानसभा अध्यक्षांकडे अनेक अधिकार असतात. त्यामुळे ते वापरून त्यांनी त्यांच्या मनातील निर्णय घेतला असेल, असा टोला लगावला.दरम्यान, घटना क्षुल्लक असली तरी त्याची राजकीय वर्तुळात मात्र जोरदार चर्चा सुरु आहे.