अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ :-पावसाळ्यात मानवी आरोग्यावर जसा परिणाम होतो, त्याचप्रमाणे जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याचा धोका असतो. ही बाब लक्षात घेऊन पशुपालक आणि शेतकरी बांधवांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे महत्वाचे असल्याचे मत पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार (ANN NEWS) मुकणे यांनी व्यक्त केले. पशुपालकांनी पावसाळा आणि साथरोगाच्या कालावधीत आपल्या जनावरांची वेळोवेळी तपासणी करुन लसीकरण करुन काळजी घ्यावी, असे आवाहनही मुकणे यांनी केलं आहे.
शेतीला खत आणि घरात दुधासारखा सकस आहार, या उद्देशाने केल्या जाणाऱ्या पशुपालनाने आज व्यावसायिक स्वरुप धारण केल्याचे आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यांनी सांगितले. त्याअनुषंगाने शेतकरी आणि पशुपालकांनी पावसाळा आणि साथरोगाच्या कालावधीत आपल्या जनावरांची वेळोवेळी तपासणी करून लसीकरण करुन काळजी घ्यावी,असे ते म्हणाले. सध्या राज्यात पशुसंवर्धन विभागातर्फे देशपातळीवरील लाळखुरकूतृ नियंत्रण लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जनावरांमध्ये विविध प्रकारचे आजार आढळतात. त्यात जिवाणूजन्य, विषाणूजन्य आणि संसर्गजन्य आजार असे प्रकार असतात. विविध माध्यमांतून निरोगी जनावरांना या आजारांची लागण होते. अनुकूल हवामान परिस्थिती असल्यास विषाणू, जिवाणूंचा जनावरांच्या विविध अवयवांत प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळं वेळीचं उपाययोजना कराव्यात असे अतिरिक्त आयुक्त डॉ. मुकणे यांनी सांगितले.
या काळाता योग्य गोठा व्यवस्थापन करा
पावसाळ्यात जनावरांची काळजी घेणं महत्वाचं आहे. पावसाळ्यात आर्द्रता वाढते आणि ऊन कमी असल्याने गोठा ओलसर रहातो. त्यामुळं जनावरांना विविध प्रकारचे आजार होतात. जनावरांची योग्य प्रकारे काळजी घेतली तर आजार कमी होवून पशुपालकाचे आर्थिक नुकसान होत नाही. बदलत्या वातावरणात प्राण्यांचे शरीर योग्य प्रकारे साथ देत नसल्यामुळं त्यांची प्रतिकारशक्ती कमी होवून जनावरे विविध प्रकारच्या आजारास बळी पडतात. त्यामुळं गोठ्याची काळजी, लसीकरण, जंतनाशक औषधीचा वापर, चाऱ्यांचे योग्य प्रकारे नियोजन करुन आपल्या जनावरांची पशुपालकांनी काळजी घेणे गरजेचं आहे. त्यामुळं योग्य वेळी जनावरांची तपासणी करुन लसीकरण करणं गजरेचं आहे.
कोरडा चारा जनावरांना द्यावा
जनावरांना पावसानं भिजलेला ओला चारा खाण्यासाठी देण्यात येऊ नये. ओले गवत मऊ असल्यानं जनावरे ते कमी वेळेत अधिक प्रमाणात खातात. परंतू, त्यात पाण्याचे प्रमाण अधिक आणि तंतूमय पदार्थ कमी असल्यानं जनावरांची पचनक्रिया बिघडून त्यांना जुलाब होतात. त्यामुळं जनावरांसाठी देण्यात येणारं पशुखाद्य किंवा सुका चारा कोरडा राहील याबाबत दक्षता घ्यावी.