Saturday, December 7, 2024
Homeकृषीकापसाचा भाव वाढणार का? शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट; सध्या किती मिळतोय दर?

कापसाचा भाव वाढणार का? शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट; सध्या किती मिळतोय दर?

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ फेब्रुवारी २०२४:- गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कापसाला चांगला भाव मिळेल, या आशेने मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. मात्र, दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि गारपीटीच्या तडाख्यात हजारो हेक्टरवरील कापसाचे पीक उद्ध्वस्त झाले. उरल्या सुरल्या आशेवर बाजारभावाने पाणी फेरलं. सध्या कापसाला कवडीमोल भाव मिळत आहे. 

कापसाला किती मिळतोय भाव?
त्यामुळे जगाचा पोशिंदाच अडचणीत सापडला आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कापसाला  सध्या प्रतिक्विंटल ५ हजार ५०० ते ६ हजार ६०० रुपये इतका भाव मिळत आहे. त्यामुळे लागवडीसाठी लागलेला खर्चही निघेनासा झाला आहे. सरकारने कापसाला जास्तीत जास्त हमी भाव द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. गेल्या आठवड्यात मराठवाडा तसेच विदर्भातील बाजारपेठांमध्ये कापसाला ६,५०० ते ७००० रुपयांपर्यंतचा भाव मिळत होता.आठवडाभरात कापसाच्या दरात मोठी घसरण मात्र, या आठवड्यात कापसाचा भाव ३०० ते ४०० रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरातच पडून आहे. दरवर्षी दिवाळीनंतर कापसाचे भाव वाढतात. दोन वर्षांपूर्वी २०२२ मध्ये जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात कापसाला चांगला भाव मिळाला होता.

दोन वर्षांपूर्वी कापसाला १० हजार रुपये भाव
पांढऱ्या सोन्याला प्रतिक्विंटल १० ते ११ हजार रुपये बाजारभाव मिळाल्याने शेतकरी मालामाल झाले होते. यावर्षी देखील कापसाचा भाव वाढेल, या आशेवर शेतकरी आहेत. मात्र, फेब्रुवारी महिना सुरू झाला तरी चांगल्या प्रतिचा कापूस भाव ६ हजार ६०० रुपयांवरच आहे.
त्यातच दिवसेंदिवस बाजारभाव कमी होत असल्याने आता किती दिवस कापूस सांभाळावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. काहीही झालं तरी पुढील वर्षी कापसाचं पीक घेणारच नाही, असा सूर शेतकऱ्यांमधून निघत आहे.

कापसाचा भाव वाढणार का?
मॉन्सूनोत्तर पाऊस आणि बोंडअळीमुळे कापसाचे उत्पन्न घटलं आहे. प्रतिएकर १० क्विंटलवर होणारे उत्पन्न ५ ते ६ क्विंटलवर येऊन ठेपलं आहे. यामुळे देशांतर्गत प्रक्रियेकामी चांगल्या कापसाची उपलब्धता कठीण वाटत आहे. परिणामी फेब्रुवारी अखेर किंवा मार्चमध्ये कापसाच्या दरात सुधारणा होऊन दर ७ हजार रुपयांपेक्षा अधिक राहतील, असा विश्‍वास या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्‍त केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!
WhatsApp