अकोला न्यूज नेटवर्क ब्युरो गणेश बुटे प्रतिनिधी चोहट्टाबाजार दिनांक ३० जुलै २०२३ – सरकारच्या विविध योजना आणि आश्वासने याचा काहीच परिणाम शेतकऱ्यांवर झालेला नाही, हे दाखवून देणारी दुर्दैवी घटना अकोट तालुक्यातील दनोरी गावात घडली आहे. शेतात जाऊन टोकाचे पाऊल उचलल्याचे सर्वत्र परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अकोट तालुक्यातील दनोरी येथे दुर्दैवी घटना समोर आली असून, शेतकऱ्याने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. गरिबी आणि आर्थिक विवंचनेतून संसाराचा गाडा हाकताना आलेल्या नैराश्यातून या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. शेतात कामासाठी गेलेल्या शेतकरी श्रीराम यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. शनिवारी २९ जुलै रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. श्रीराम विठ्ठल खराटे वय 70 वर्ष रा.दनोरी असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
श्रीराम खराटे यांच्याकडे दीड एकर शेती आहे. तर कुटुंबाची परिस्थिती हलाखीची आहे. संसाराचा उदरनिर्वाह दीड एकर शेतीवर भागत नव्हते. मात्र मागच्या वर्षे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आणि यंदा पावसाळा उशिरा झाला. अशात आर्थिक तंगीमुळे संसारात ओढाताण होऊ लागली. यामुळे श्रीराम खराटे हे नैराश्यात होते. या बाबत माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना या विषयी माहिती देऊन दहीहंडा पोलिसांनी घटनास्थळावर पंचनामा करून मृतक श्रीराम विठ्ठल खराटे यांचा मृतदेह अकोट ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.