अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २६ ऑगस्ट २०२३:-निम्म्याहून अधिक हंगाम संपला तरी पावसाचा रुसवा कायम असून पावसाळ्याच्या उर्वरित सव्वा महिन्यात अत्यल्प पाऊस झाल्यास विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा आणि वाशीम या जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट घोंघावण्याची चिन्हे आहेत.यंदा पावसाळ्यात आतापर्यंत भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ व गडचिरोली जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याची माहिती प्रादेशिक वेधशाळेने दिली आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी पावसाळ्याची सुरुवात दमदार झाली असली शेवटच्या ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पावसाच्या अंदाजापेक्षा कमी पाऊस झाला. तर सप्टेंबरमध्ये पाऊस ओढ देण्याची शक्यता आहे.
त्यामुळे यंदाचा पाऊस सरासरीच्या तुलनेत कमी राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या प्रादेशिक वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्हयात अद्याप सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.तर त्यातुलनेत भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे. पुढील दहा दिवसात जर अपेक्षित पाऊस होऊ शकला नाहीतर दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यंदा पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरीच्या तुलनेत ९४ टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
मात्र हा अंदाज काही अंशी चुकीचा ठरल्याचे आकडेवारीवरून म्हणता येईल. ज्या भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने त्याचा शेतीवरही परिणाम झालेला दिसून येतो. चालू हंगामात जर पावसाने तूट भरून काढली नाही तर खरिपाच्या उत्पादनात मोठी घट होण्याचा धोका आहे.एवढेच नाहीतर रब्बी पिकांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. अनेक ठिकाणचे प्रकल्प १०० टक्के भरलेले नाहीत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो असा धोका असल्याचा अंदाज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने वर्तवला आहे.