अकोला न्यूज नेटवर्क दिनांक २५ ऑगस्ट २०२३:-दरवर्षीप्रमाणे या यावर्षी सुद्धा श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी अकोल्यात कावड व पालखी महोत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवाच्या मार्गावर अकोला ते गांधीग्राम दरम्यान शिवभक्तांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी 10 आरोग्य पथके तैनात करण्यात आले असून या पथकातील अधिकारी, कर्मचारी यांना ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी कामावर हजर राहण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत.दरवर्षी श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी अकोला शहरामध्ये कावड व पालखी महोत्सव मोठ्या भक्ती भावात साजरा होतो. यावर्षीचा कावड व पालखी महोत्सव 11 सप्टेंबर रोजी साजरा होणार आहे. या महोत्सवात अकोला शहर व परिसरातील हजारो शिवभक्त सहभागी होतात. गांधीग्राम येथील पूर्णा नदीतून कावडीमध्ये जल भरून या कावडी खांद्यावर घेऊन

अकोल्याच्या श्री राजराजेश्वर मंदिरापर्यंत पोहोचतात व तेथे श्री राजराजेश्वराला जलाभिषेक केला जातो. 2 भरण्यांपासून ते 501 एक भरण्यांपर्यंतच्या मोठमोठ्या कावडी या महोत्सवात सहभागी असतात. सोबत विविध पद्धतीने सजविलेल्या आकर्षक पालख्या सुद्धा या महोत्सवात सहभागी होतात. या कावड व पालखी महोत्सवात हजारो भाविकांचा सहभाग असतो. 10 सप्टेंबरच्या दुपारपासून भाविक गांधीग्रामकडे रवाना होतील. 11 सप्टेंबरच्या सायंकाळपर्यंत हा महोत्सव सुरू राहील. या दरम्यान कावड व पालखी मार्गावर हजारो शिवभक्तांना आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचे प्रमुख निलेश देव यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेने 10 व 11 सप्टेंबर रोजी अकोला ते गांधीग्राम या मार्गावर शिवभक्तांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी दहा पथके तैनात करण्याचे आदेश काढले आहेत. या प्रत्येक पथकामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, ॲम्ब्युलन्स चालक यांचा समावेश असणार असून प्रत्येक पथकासोबत एक ॲम्बुलन्स असणार आहे.प्रत्येक पथकातील वरील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसांसाठी वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये वेगवेगळ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यांची नियुक्ती या पथकांमध्ये करण्यात आली त्यांना या दोन दिवसात कोणतीही रजा मिळणार नाही. तसेच पथक प्रमुखांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर करून घ्यावे याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागाने आदेश काढले आहेत. यावर्षीच्या पालखी व कावड महोत्सवात हजारो शिवभक्तांना आरोग्य सुविधा व सेवा मिळणार आहेत.

ॲड बाळासाहेब आंबेडकरांकडून दखल
कावड व पालखी महोत्सवातील शिवभक्तांना शहरातील विविध मान्यवरांकडून दरवर्षी चहापाणी, फराळ, भोजन अशा सुविधा पुरविल्या जातात. परंतु अनेक क्विंटलचे कावडींचे ओझे खांद्यावर घेऊन अकोल्याकडे येताना अनेक शिवभक्त जखमी होतात, अनेकांना दुखापत होते. या दिवशी या मार्गावर वाहनांना प्रवेश नसतो. त्यामुळे जखमी झालेल्या शिवभक्तांना अकोल्यापर्यंत व दवाखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप त्रास होतो. ही गंभीर बाब सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी वंचितचे राष्ट्रीय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर, प्रा. सौ. अंजलीताई आंबेडकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी शिवभक्तांसाठी कावड मार्गावर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांना निर्देश दिले होते.

निलेश देव यांच्या पाठपुराव्याला यश
ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचे प्रमुख निलेश देव यांनी शिवभक्तांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी जि. प. अध्यक्ष संगीताताई अढाऊ यांना काही दिवसांपूर्वी पत्र दिले. त्या पत्राची दखल घेऊन जि.प. अध्यक्षांनी आरोग्य विभागाला याबाबत नियोजन करण्यास सांगितले. त्यानुसार जिल्हा परिषद आरोग्य विभागाने 10 व 11 सप्टेंबर रोजी अकोला ते गांधीग्राम मार्गावर कावड व पालखी महोत्सवातील शिवभक्तांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी 10 पथके तैनात करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे निलेश देव यांच्या पाठपुरावा व मागणीला यश मिळाल्याने शिवभक्तांकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

या ठिकाणी असतील पथके तैनात
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने शिवभक्तांच्या आरोग्य सुविधेसाठी नियोजित करण्यात आलेल्या पथकांपैकी 2 पथके गांधीग्राम येथे तैनात असतील. याशिवाय वल्लभनगर, कासली फाटा, उगवा फाटा, सुकोडा फाटा, सांगवी मोहाडी फाटा, पाचमोरी या ठिकाणी प्रत्येकी एक पथक तैनात असेल. तेथून अकोला शहरापर्यंत दोन पथके तैनात राहतील.

गांधीग्राम चा दवाखाना 24 तास सुरू राहणार
श्रावण महिन्यामध्ये अकोला येथून अनेक भाविक गांधीग्राम येथे तसेच धारगड येथे जात असतात. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता गांधीग्राम व धारगड येथे जाणाऱ्या व तेथून परत येणाऱ्या शिवभक्तांना रस्त्यात आरोग्य सुविधेची गरज भासू शकते. शिवाय आपत्ती जनक परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी गांधीग्राम येथील दवाखाना श्रावण महिन्यामध्ये 24 तास सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाने काढले आहेत. त्यानुसार गांधीग्राम येथील जिल्हा परिषदेचा दवाखाना 24 तास सुरू ठेवण्यासाठी रात्र व दिवस पाळी मध्ये आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.


Share post:

Popular

More like this
Related

नीलगायीच्या धडकेत दोन मजूर जखमी !

अकोला न्यूज नेटवर्क राहुल सोनोने प्रतिनिधी वाडेगाव दिनांक ०३...

नितीन गडकरींनी दाखवले मोठे स्वप्न एक दिवस येईल देशात पेट्रोल-डिझेल पंप नसतील

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०३ ऑक्टोबर २०२३ :-हवेत उडणाऱ्या...

घरात अचानक गजानन महाराज प्रगटले? दर्शनासाठी भाविकांची तुफान गर्दी, VIDEO व्हायरल

अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ :...

फोनच्या कव्हरमध्ये नोट ठेवण्याची सवय ठरू शकते जीवघेणी !

अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ :-मोबाईल कव्हरमध्ये...
error: Content is protected !!