अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ११ फेब्रुवारी २०२४:- अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात भाविकांसाठी विविध सुविधा व आवश्यक विकासासाठी निधी मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली.
पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी आज श्री राजराजेश्वराचे मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले व मंदिरातील नियोजित विकास कामांबाबत व्यवस्थापन समितीसोबत चर्चा केली. आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि प. सीईओ बी. वैष्णवी, महापालिका आयुक्त कविता द्विवेदी, मंदिर व्यवस्थापन समितीचे आर. एस. ठाकरे, राम पाटील भौरदकर, नरेश लोहिया, गजानन घोंगे, सुधीर अभ्यंकर आदी उपस्थित होते.मंदिरात विविध सुविधा व नियोजित विकासकामांबाबत पालकमंत्री, तसेच व्यवस्थापन समितीसमोर चर्चा करण्यात आली. त्यासंबंधी कोल्हापूर येथील तज्ज्ञ विद्याधर ढोमसे यांनी आराखड्याचे सादरीकरण केले.
मंदिर व्यवस्थापन समितीच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या सूचनांनुसार आराखड्यात बदल करण्यात येतील. मंदिरांत भक्तांसाठी आवश्यक सर्व सुविधा असाव्यात. डायनिंग हॉल, कल्चरल हॉल, किचन, स्वच्छतागृह, वाहनतळ, फायर प्रोटेक्शन, लिफ्ट, घाटाचे सौंदर्यीकरण आदी सर्व कामांचा समावेश असावा. उपलब्ध जागा लक्षात घेता बहुमजली सुविधा इमारत असावी. मंदिराच्या विस्ताराबाबत आजूबाजूच्या नागरिकांशी चर्चा, विचारविनिमय करून जागा उपलब्ध होते किंवा कसे, याचा प्रयत्न करावा. श्री राजराजेश्वर हे अकोल्याचे ग्रामदैवत असून, सुविधा, विस्तार आणि विकासासाठी आवश्यक निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.
आराखड्यानुसार, मंदिरात भाविकाला बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडेल, अशी रचना प्रस्तावित आहे. कावड पालखीचे महत्व लक्षात घेता भोवती मोकळी जागा उपलब्ध असेल. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आदी पंचमहाभूतांचे व पर्यावरणाचे महत्व सांगणारा जलस्तंभ, नाग आदी विशाल प्रतिकृती आदी अनेक बाबी आराखड्यात प्रस्तावित आहेत, असे श्री. ढोमसे यांनी सादरीकरणात सांगितले. याबाबत मंदिर व्यवस्थापनासह सविस्तर चर्चा करून आराखडा निश्चित केला जाणार आहे.