अकोला न्युज नेटवर्क डेक्स दिनांक २५ सप्टेंबर २०२३ स्वप्नील सुरवाडे पातूर: तालुक्यातील ग्राम आगीखेड येथे सार्वजनिक विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पातूर तालुक्यातील आगीखेड येथील नवीन वस्तीत असलेल्या सार्वजनिक विहीरीत एका इसमाने उडी घेऊन आत्महत्या केल्याने गावात एकच खळबळ उडाली.
गावातील काही धाडसी युवकांनी विहिरीत उतरून सदर इसमाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला,मात्र विहिरीचे पाणी खोल असल्यामुळे त्यांना या इसमाचा थांगपत्ता लागला नाही.दरम्यान पातूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थतीची पाहणी करून पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक यांना पाचारण केले.तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आत्महत्या केलेल्या इसमाचे प्रेत बाहेर काढण्यात यश आले.यावेळी संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे,पत्रकार दुले खान,पप्पू चौरे यांनी मृतदेह काढण्यासाठी विशेष सहकार्य केले.
सदर आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव राजू शिवाजी कांबळे असे निष्पन्न झाले असून आत्महत्या करण्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.दरम्यान पातूर पोलीस स्टेशनचे पीएसआय गजानन पोटे,दिगोडे मेजर,आवटे मेजर यांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविला असून पुढील कारवाई ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पातूर पोलीस करीत आहेत.