अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०७ सप्टेंबर २०२३ :- अकोला शहरातील पालखी व कावड महोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना टिळक रोड ते अकोट स्टैंड ते मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेपर्यंतच्या सिमेंट रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यांवरील खड्यांमुळे अनवाणी पायाने शहरात दाखल होणाऱ्या शिवभक्तांच्या पायाला गंभीर दुखापती होण्याची शक्यता आहे.रस्ते दुरुस्तीसंदर्भात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिलेले निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाने धाब्यावर बसविल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या पालखी व कावड उत्सवाला अवघ्या चार दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या महोत्सवाला ७५ वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभली असून हा भव्यदिव्य सोहळा पाहण्यासाठी इतर राज्यांतील शिवभक्तदेखील गर्दी करतात. श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी हजारो शिवभक्त गांधीग्राम येथून अनवानी पायाने शहरात दाखल होतात. त्यांच्या खांद्यावर वजनदार पालखी व हजारो किलो वजनाची कावड असते. रस्त्यात पडलेली बारीक चुरी, गट्टीमुळे शिवभक्तांच्या पायाला गंभीर जखमा होतात. ही बाब ध्यानात घेऊन शिवभक्तांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये
चार महिन्यांत रस्त्याला जागोजागी तडे
स्थानिक आमदार विकास निधीअंतर्गत टिळक रोड ते शिवाजी पार्कपर्यंत सिमेंट रस्त्याचे निर्माण करण्यात आले. रस्त्याचे निर्माण केल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत रस्त्याला जागोजागी तडे जाऊन खड्डे पडल्याचे समोर आले. हा प्रकार पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराची पोलखोल झाली आहे. दरम्यान, रविवारपर्यंत या रस्त्याची दुरुस्ती होईल का, असा सवाल शिवभक्तांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, रस्त्याची दुरवस्था पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
यासाठी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. पालखी व कावडचा मुख्य रस्ता असलेल्या टिळक रोड ते शिवाजी पार्कपर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. रस्त्यावर जागोजागी गिट्टी विखुरली आहे. हा प्रकार पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशांना केराची टोपली दाखवल्याचे समोर आले आहे.(AKOLA NEWS NETWORK )