अकोला न्यूज नेटवर्क दिनांक ०५ फेब्रुवारी २०२४:- राठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. येत्या १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. १० तारखेलाच मराठा समाजाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा आणि आरक्षण लागू व्हावं म्हणून आमरण उपोषण करणार आहे, असं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे.यावेळी बोलताना त्यांनी सरकारच्या अधिसूचनेवरुन टीका करणाऱ्यांवरही निशाणा साधला. काही जण सरकारची सुपारी घेऊन सोशल मीडियावर ट्रॅप करत आहेत. त्यांना पद पैसे हवे आहेत.७० ते ७५ वर्षात जे झालं नाही ते आज झाल्याने काही नेते आणि समाजात काम करणारे नेते जळत आहेत. त्यांना असं वाटत आहे त्यांची दुकाने बंद झाली. त्यांच्या ट्रॅपला मी घाबरत नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. (ANN NEWS व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सरकारच्या निर्णयाचा ६० लाख मराठा बांधवांना फायदा होणार आहे. काही सत्ताधारी लोक सोशल मीडियावर श्रेय घेत आहेत. त्यांना आवाहन आहे की श्रेय घेऊ नका, हे सर्व मराठ्यांचं श्रेय आहे. ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत, त्या सर्वांना आरक्षण मिळणार आहे. सगेसोयरेबाबत सरकार अध्यादेश काढत नव्हतं.
मात्र मराठा आंदोलनामुळे सरकारच्या हालचाली सुरु झाल्या. कायद्यात बदल करताना अधिसूचना काढव्या लागतात आणि सरकारने काढल्या. येत्या १५ फेब्रुवारीच्या अधिवेशनात कायदा करायचा आहे. त्यामुळे मुंबईत मराठे गेले आणि आरक्षण घेऊन आले, असं मनोज जरांगे यांनी ठामपणे सांगितलं.